रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवलेली शाळा पाडणार
#बालासोर
ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतदेह ज्या शाळेच्या इमारतीत ठेवले होते ती आता पाडण्याचे काम सुरू आहे. मृतदेह ठेवल्याने मुले आणि शिक्षक शाळेत येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे ही इमारत पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी तेथे पूजापाठ करून शाळा इमारतीच्या वापरास सुरुवात होईल.
बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बहंगा हायस्कूलमध्ये मृतदेह ठेवले होते. बचाव पथकाने ६५ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीच्या दोन खोल्या आणि हॉलचे रूपांतर तात्पुरत्या शवागारात केले होते. कफनमध्ये गुंडाळलेले मृतदेह येथे ठेवले होते. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन म्हणाल्या की, मृतदेह ठेवल्याने लहान मुले येथे येण्यास घाबरतात. इमारत पूर्ण झाल्यानंतर, शाळेने आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची आणि त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी काही विधी आयोजित करण्याची योजना आखली आहे. शाळेत सुमारे ६५० मुले शिकतात.
बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे याबाबत म्हणाले की, मुलांना भीती वाटू नये म्हणून त्यांना जुनी इमारत पाडायची आहे. सध्या ही शाळा तात्पुरती पाडली जात असली तरी ती पूर्णपणे पाडण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
वृत्तसंस्था