सग्रहीत छायाचित्र
देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-१९ रुग्णांची संख्या ४ हजारांवर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनने (डब्लूएचओ) माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी आता करोनाबाबत आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे, भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान सौम्या स्वामिनाथन यांनी करोनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, सध्या करोनाचा धोका वाढतो आहे ही बाब खरी आहे. मात्र चिंतेची आवश्यकता नाही. २०२० मध्ये जशी स्थिती आली होती तशी परिस्थिती आता येणार नाही. एका मुलाखतीत सौम्या स्वामिनाथन यांनी हे भाष्य केले आहे. कोविड, सार्स-कोव्ही २ हे विषाणूचे व्हेरिएंट आहेत. मात्र हा विषाणूचा व्हेरिएंट आता तसा सामान्य आहे. करोनाचा विषाणू म्युटेट होत असतो म्हणजेच त्यात सातत्याने बदल होतो आहे. आता करोना व्हायरला पाच वर्षे झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही, असे सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.
२०२०-२०२१ सारखी स्थिती पुन्हा येणार नाही
करोनाच्या डेल्टा व्हायरस आल्यानंतर करोनाची दुसरी लाट आली होती. तशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे का? त्यावर सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, अशी परिस्थिती आता पुन्हा येणार नाही. २०२० किंवा २०२१ सारखी परिस्थिती आता नसेल. त्यावेळी करोनाचा विषाणूच लोकांना माहीत नव्हता. मात्र तो अनुभव आता लोकांना येणार नाही. करोनाच्या दोन ते तीन लाटा महाराष्ट्रासह देशाने अनुभवल्या आहेत. आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. मात्र आता घाबरण्यासारखे काहीही कारण नाही.