वैमानिकाच्या मैत्रिणीने केला कॉकपिटमधून प्रवास
# नवी दिल्ली
एअर इंडियाच्या दुबई-नवी दिल्ली विमान प्रवासाच्या दरम्यान वैमानिकाने आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसण्याची परवानगी दिल्याच्या घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचालकांनी(डीजीसीए) गंभीर दखल घेतली असून त्यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वरील प्रकार हा २७ फेब्रुवारीला घडला होता.
एअर इंडियाच्या वाहतूक सुरक्षा आणि गुणवत्ता विभागप्रमुखांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दुबईहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानातील एका कर्मचाऱ्याने वरील तक्रार केली होती. वैमानिकाने प्रवासाच्या काळात आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसण्याची परवानगी दिल्याचा तक्रारीत उल्लेख होता. या झालेल्या घटनेचा वेळेत अहवाल का दिला नाही अशीही विचारणा नोटिशीत करण्यात आली असून ही नोटीस २१ एप्रिलला बजावली आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकाशिवाय आणि विमानातील कर्मचाऱ्याशिवाय कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नसते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यालाही विलंब झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत एअर इंडियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत दुबई-नवी दिल्ली मार्गावरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना अन्य मार्गावर ड्यूटी देण्याचा आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचालकांनी दिला होता. २१ एप्रिलला एअर इंडियाने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.
वृत्तसंस्था