सध्याचे लिंगायत मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण
#बंगळुरू
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्दरामया यानी केलेल्या एका विधानामुळे पक्ष अडचणीत आला आहे. पुढील मुख्यमंत्री लिंगायत नेता असावा या भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्दरामया अडचणीत आले. ते म्हणाले की, या पदावर सध्या एक लिंगायत नेताच मुख्यमंत्री असून तोच राज्यातील भ्रष्टाचाराचे मुख्य कारण आहे. याच विधानावरून भारतीय जनता पक्षाने सिद्दरामया यांना लक्ष्य केले असून लिंगायत नेता मुख्यमंत्री होण्यास काँग्रेसचा विरोध असून त्यांनी लिंगायत समाजाचा अपमान केल्याची टीका भाजपने सुरू केली आहे.
आपले विधान केवळ बोम्मई यांना उद्देशून असल्याचा खुलासा सिद्दरामया यांनी केला असला तरी बोम्मई यांनी मात्र काँग्रेसचा लिंगायत समाजाला विरोध असल्याचा आरोप केला आहे. सिद्दरामया म्हणाले की, माझे विधान केवळ बोम्मई यांना उद्देशून होते. केवळ बोम्मई हे भ्रष्ट असल्याचे मी म्हणालो होतो.
लिंगायत समाज भ्रष्ट असल्याचे विधान मी केलेले नाही. यामुळे अशा प्रकारे बदनामी करणे योग्य नाही. राज्यात अनेक प्रामाणिक लिंगायत मुख्यमंत्री झालेले आहेत. निजलिंगाप्पा, वीरेंद्र पाटील यांच्यासारखे अनेक लिंगायत मुख्यमंत्री प्रामाणिक होते. त्यांचा मी आदर करतो. माझ्या विधानाची तोडमोड करून त्यातून चुकीचा अर्थ काढला जात आहे.
बोम्मई म्हणाले की, सिद्दरामयासारख्या माजी मुख्यमंत्र्याने असे विधान करणे योग्य नाही. त्यांनी सारा लिंगायत समाज भ्रष्ट असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी ब्राम्हण समाजाला असेच लक्ष केले जात असे. सिद्दरामया मुख्यमंत्री असताना त्यांनी लिंगायत आणि वीरशैव समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. राज्यातील जनता सिद्दरामया यांना नक्कीच धडा शिकवेल.
वृत्तसंस्था