कोर्ट म्हणते, सायकलस्वारालाही आता वाहनचालक समजावे
#नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना रस्ता अपघातात जीव गमावलेल्या सायकलस्वाराच्या कुटुंबीयांना ३८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश देताना न्यायालयाने सायकलस्वारालाही रस्त्यावरील वाहनचालक समजावे, अशी टिप्पणी केली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो सायकलस्वारांना आता अपघात वाहन विमा योजनेनुसार नुकसान भरपाई मागता येईल.
कडकडडूमा न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायाधीश हारुण प्रताप यांनी या प्रकरणी सरकार आणि लोकांच्या जागरूकतेवर भाष्य केले आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवण्यासाठी काही नियम आहेत. त्याच्या अंमलबजावणीची पहिली जबाबदारी सरकारची आहे. शासनाने सायकल ट्रॅक बनविण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत ही योजना अर्धवट आहे. ज्या ठिकाणी ट्रॅक बनवले आहेत, त्यांचा वापर केला जात नाही. वाहतूक पोलिसांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची जबाबदारीही सरकारी विभागाची आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. देवेंद्र हा सोनिया विहार परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करायचा. २७ जुलै २०२१ रोजी एका वेगवान कारने त्याच्या सायकलला धडक दिली. यामध्ये देवेंद्र यांचा मृत्यू झाला होता. देवेंद्र (२५) यांच्यावर आई आणि चार लहान भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी होती. आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
अधिवक्ता उपेंद्र सिंह म्हणाले की, बाह्य रिंगरोड, मुख्य रस्ते, राष्ट्रीय महामार्ग इत्यादी मुख्य रस्त्यांवर सायकल चालवता येत नाही. स्वतंत्र ट्रॅक असेल तरच या ठिकाणी सायकल चालवता येईल. पण, या रस्त्यांवर सायकल चालवल्या जात असल्याचे दिसून येते. पोलिसांनी सायकलस्वारांना येथे येण्यापासून रोखावे.