उत्तराखंडमध्ये 'लव्ह जिहाद'वरून वातावरण तापले; हिंदू संघटना आक्रमक
#डेहराडून
उत्तराखंडमध्ये गेल्या ३ वर्षात १०३५ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील केवळ अल्मोडा जिल्ह्यात ६४ महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे, त्यापैकी ५५ महिलांना घरी परत आणण्यात आले आहे. हिंदू मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्यातील हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी विविध ठिकाणच्या व्यावसायिकांच्या दुकानांची मोडतोड करायला सुरुवात केली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तरकाशीच्या पुरोला येथील दोन तरुण एका मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले. काही मुस्लिम दुकानदार हिंदू मुलींना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि स्थानिकांनी संताप व्यक्त करत मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिस-प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. त्यांनतर हिंदू संघटनांनी हिंसाचार करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे.
मदनी यांचे अमित शहांना पत्र
उत्तराखंडमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. असद यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. समाज तोडणाऱ्या शक्तींवर कारवाई करून लोकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करावे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तराखंड वक्फ बोर्ड आणि हज समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली आहे.