सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका
#नवी दिल्ली
विमान प्रवासातील गैरप्रकार थांबायला तयार नाहीत. कोणी मद्यधुंद अवस्थेत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करते, तर कोणी कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने चुंबन घेत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केल्याच्या आरोपाखाली दिल्ली विमानतळावर पकडले आहे.
एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी सोमवारी (२४ एप्रिल) सांगितले की, आरोपी प्रवासी दारूच्या नशेत होता. वाद झाल्यानंतर त्याने सहप्रवाशावर लघुशंका केली. हा प्रकार अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट एए २९२ मध्ये घडला. आरोपी प्रवाशाला रविवारी रात्री ९ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने पकडले. विमान कंपन्यांनी लँडिंगपूर्वी दिल्ली विमानतळाला ही बाब कळवली आणि या प्रकरणातील दोन्ही प्रवाशांना नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पीडित प्रवाशाने याबाबत औपचारिक तक्रार दाखल केली आहे. नागरी विमान वाहतूक कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन एअरलाइन्सने सांगितले की, विमानातील घटनेबाबत एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अलीकडच्या काळात, मद्य प्राशन केल्यानंतर सहप्रवाशांवर लघुशंका केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद पुरुषाने ७० वर्षीय महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप केला होता.