दिल्लीतील साकेत कोर्टात महिलेवर गोळीबार करणाऱ्या संशयितास अटक
#दिल्ली
दिल्लीतील साकेत न्यायालय संकुलाच्या आवारात दोघाजणांवर गोळीबार केल्याच्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथे एका संशयितास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मारेकऱ्याचे नाव जाहीर केलेले नाही. त्याने एम. राधा नावाच्या महिलेवर चार-पाच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येते. या महिलेच्या पोटावर दोन तर हातावर एक गोळी झाडण्यात आली आहे. जखमी झालेली दुसरी व्यक्ती वकील असून या दोघा जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेने मोठ्या रकमेला आपणाला फसवल्याची संशयिताची तक्रार आहे.
संशयित मारेकऱ्याची आता चौकशी सुरू आहे. गोळीबारासाठी त्याने वापरलेली बंदूकही ताब्यात घेतली असून तिची तपासणी सुरू आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये ही महिला गोळीबार करणाऱ्याला त्याची गुंतवणूक दुप्पट करून देत असल्याचे ऐकावयास मिळते. मात्र, त्यानंतर आपले पोट धरत ती ओरडत असल्याचे पाहावयास मिळते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा संशयितही वकील आहे. बार कौन्सिलने त्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. मात्र, असे असले तरी गोळीबार झाला त्यावेळी त्याने काळा कोट घातला होता. त्यामुळेच तो महिलेच्या जवळ जाऊ शकला आणि गोळीबारानंतर पळून जाऊ शकला. ज्या महिलेवर गोळीबार झाला तिच्यावरही फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एम. राधा असे नाव असलेल्या या महिलेने संशयिताकडून पैसे घेतलेले होते. या प्रकरणी तिच्याविरुद्ध डिसेंबरमध्ये तक्रारही दाखल झाली होती.
वृत्तसंस्था