शरीरसंबंध निर्णयासाठी सोळा वर्षांची मुलगी सक्षम
#शिलाँग
मेघालय उच्च न्यायालयाने पॉक्सोच्या एका प्रकरणात महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. शरीर संबंधाबाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असे मत मेघालय उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून सोबतच न्यायालयाने पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत.
मेघालय उच्च न्यायालयाने पॉक्सो प्रकरणात हे महत्त्वाचं मत मांडले आहे. शरीर संबंधाबाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असे मत न्यायालयाने मांडले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एका व्यक्तीवर १६ वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा आरोपी तरुणाने केला होता.
या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसेच, त्या मुलीनेही न्यायालयातील आपल्या जवाबात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले होतं. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी कोणतीही जबरदस्ती झालेली नव्हती. त्यामुळे, यातील शरीर संबंधाकडे बलात्कार म्हणून पाहू नये अशी मागणी आरोपी तरुणाने केली होती.
मेघालय उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. या घटनेतील पीडितेच्या वयातील व्यक्तींचा मानसिक आणि शारीरिक विकास पाहता, लैंगिक संबंधांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असतात असे कोर्टाने म्हटले. न्यायमूर्ती डब्लू. डिएंगदोह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामुळे या तरुणाविरुद्धचा पॉक्सोचा गुन्हा रद्द करावा असे आदेशही कोर्टाने दिले.