शिवकुमार-सिद्धरामया यांच्या₹त मनोमिलन
#नवी दिल्ली
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सिद्धरामया यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा एक व्हीडीओ काँग्रेसने आपल्या ट्विटरवरून व्हायरल केला आहे. या व्हीडीओवर काँग्रेस म्हणते की, आम्ही एकत्र असून या एकीतून आम्ही पक्षाला विजयी करू.
कर्नाटक काँग्रेसमधील या दोन वरिष्ठ नेत्यांत मुख्यमंत्रिपदावरून सुप्त राजकीय स्पर्धा असून त्यांच्यातील मतभेदांमुळे पक्षाची पिछेहाट होईल, असे मत अनेक राजकीय नेते व्यक्त करत होते. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला सध्या प्रतिकूल राजकीय स्थितीस सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचार, इतिहासाचे विकृतीकरण, गैरकारभाराचे अनेक आरोप झाले आहेत. पक्षाला अनुकूल स्थिती असली तरी काँग्रेसमधील
मतभेदांमुळे राजकीय फायदा उठवता येणार नाही, असे बोलले जात होते. मुख्यमंत्रिपदासाठी डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामया यांच्यात स्पर्धा असल्याचे सर्वांना माहीत होते. या दोघांनीही आपल्या समर्थकांना फूस लावल्याने पक्षातील तीव्र गटबाजी उघड होत होती. सिद्धरामया यांनी अलीकडेच एका मुलाखतीत ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. तसेच काँग्रेसला विजय हवा असेल तर शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊ नये असे विधान केल्याचेही त्यांनी नाकारले होते.
उत्तर आणि दक्षिण कर्नाटकात या दोन्ही नेत्यांनी फेब्रुवारीत वेगवेगळे दौरे केल्याने त्यांच्यातील मतभेदाची आणखी चर्चा झाली होती. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यानंतर मात्र त्यांनी एकत्र दौरा केला होता.
वृत्तसंस्था