उत्तराखंड | उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात आज सकाळी भीषण हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला. केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेले हे हेलिकॉप्टर सकाळी सुमारे ५.२० च्या सुमारास कोसळले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच भाविक, एक लहान मूल आणि पायलट यांचा समावेश होता.
मृतांमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील भाविकांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण दल) यांची पथकं तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. बचाव आणि शोध मोहिम सुरू आहे.
ही घटना अत्यंत वेदनादायक असतानाच, गेल्या सहा आठवड्यांतली ही पाचवी विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नुकतीच अहमदाबाद विमानतळावर एक अपघात घडलेला असतानाच उत्तराखंडमध्ये झालेल्या या अपघाताने हवाई सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हवामान खराबी, तांत्रिक बिघाड की मानवी चूक — नेमका अपघाताचा कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनही घटनेची गंभीर दखल घेतली गेली आहे. भाविकांची वारंवारता वाढलेल्या धार्मिक पर्यटन हंगामात अशा प्रकारच्या घटना पुन्हा न होण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे.