‘माघारीचे वृत्त केवळ अफवा’
#नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याच्या वृत्ताचा कुस्तीगीर साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण कामावर परतलो असलो तरी आंदोलन मागे घेतले नाही, घेणार नाही, अटकेची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन कायम राहील असे स्पष्ट केले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ऑलिम्पिंक्स पदक विजेती साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही गृहमंत्री शाह यांना भेटलो. त्यांच्याशी सर्वसाधारण चर्चा झाली. त्यातून कोणताही तोडगा हाती आलेला नाही. ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी कायम आहे. आंदोलन मागे घेतल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. रेल्वेतील काही कामे पूर्ण करण्यासाठी कार्यालयात गेले होते. आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही लवकरच आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गेले महिनाभर आंदोलन करणारे कुस्तीगीर साक्षी मलिक, बजरंग पूनिया आणि विनेश फोगाट यांनी रविवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. ही भेट दोन तास झाली. यानंतर सोमवारी ( ५ जून ) साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचे वृत्त पसरले.
दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं ट्वीट केलं होते. त्या म्हणाल्या की, “कुस्तीगिरांच्या आंदोलनातून साक्षी मलिकने माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे.”
या वृत्ताचा इन्कार करताना साक्षी मलिक ट्वीटमध्ये म्हणते की, हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणी मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नका. आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांच्याकडे ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी केली. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होत आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच, अल्पवयीन खेळाडूने एफआयआर मागे घेतल्याचे वृत्तही चुकीचं आहे. असं साक्षी मलिकने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
बजरंग पूनियानेही ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणतो की, आंदोलनातून माघार घेत असल्याचे वृत्त ही अफवा आहे. आंदोलनाला नुकसान पोहचवण्यासाठी हे वृत्त पसरवलं जात आहे. आम्ही ना माघार घेतली आहे, ना आंदोलन मागे घेतले आहे. महिला कुस्तीपटूने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही खोटे आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार.
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. या अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतल्याचे वृत्त व्हायरल झाले. संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची तक्रार दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवली होती. परंतु, हे आरोप तिने २ जून रोजी मागे घेतले असल्याचं वृत्त पसरले आहे. ही तक्रार मागे घेताना तिचे वडील आणि आजोबाही उपस्थित होते, असेही म्हटले गेले. या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी खुलासा केला आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, आम्ही नोंदवलेल्या जबाबावर आजही ठाम आहोत. मी सध्या हरयाणा येथे आहे, दिल्लीत नाही. अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्याने ब्रिजभूषण यांच्या विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळेच ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
कुस्तीगीर साक्षी मलिक, बजरंग पूनिया आणि विनेश फोगाट यांनी रविवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पूनिया व विनेश फोगाट आपल्या नोकरीवर परतलेत. हे तिघेही रेल्वेत नोकरी करतात. रेल्वेच्या जनसंपर्काचे संचालक जनरल योगेश बवेजा यांनी याची पुष्टी केली आहे.
अल्पवयीन कुस्तीपटूने तक्रार मागे घेतल्यास ब्रिजभूषण यांच्या विरोधातील पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला जाईल. त्यानंतर केवळ विनयभंगाचे प्रकरण राहील. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची गरज भासणार नाही.