राहुल गांधी पुन्हा अमेरिका दौऱ्यावर
#नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार राहुल गांधी ३१ मे रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा १० दिवसांचा असणार आहे. ४ जून रोजी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी राहुल गांधी अनिवासी भारतीयांना (एनआरआय) संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे ५ हजार एनआरआय असणार आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पॅनल चर्चेतही राहुल गांधी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला जातील आणि तिथल्या नेत्यांना भेटणार आहेत तसंच उद्योजकांनाही भेटणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जूनला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच राहुल गांधी यांचा हा दौरा असणार आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी याच वर्षी मार्च महिन्यात लंडनचा दौरा केला होता. त्यावेळी केंब्रिज विद्यापीठात भाषण केले होते. त्यावेळी भारतात लोकशाहीवर सातत्याने हल्ले होत असल्याचे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपाने सातत्याने त्यांना लक्ष्य केले होते. तसेच
राहुल गांधी यांनी माफी मागावी अशीही मागणी केली होती. आता राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. तिथे काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. वृत्तसंस्था