पंतप्रधान मोदी विषारी सापासारखे
#बंगळुरू
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी कर्नाटक विधानसभा प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. हा व्हीडीओ भाजपचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे खर्गे यांचे विधान सध्या जोरदार चर्चेत आले आहे.
सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कधी नव्हे ते अभ्यासकांनी कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळणार असे भाकीत वर्तवले आहे. त्यात कर्नाटक काँग्रेसमधील संघर्ष थांबल्याचे वृत्त आहे. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे तर १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी थेट मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्यामुळे राज्यातील प्रचाराची पातळी पुन्हा घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. कानडी भाषेत खर्गे यांनी, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर समजू नका, परंतु ते चाखले तर तुम्हीच मरून जाल, असे सांगितले आहे. मात्र खर्गे यांच्या विधानानंतर भाजप नेते संतापले आहेत. दरम्यान खर्गे यांच्या टीकेनंतर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते मोदींना विषारी साप म्हणाले आहेत, परंतु विष तर काँग्रेसने देशात रुजवले आहे. समाजात विषमतेचे विष, देशाच्या फाळणीचे विष, भ्रष्टाचाराचे विष, राजकारणात घराणेशाहीचे विष काँग्रेसने रुजवल्याचे राय म्हणाले आहेत.
यापूर्वी अनेक वेळा झाली होती मोदींवर व्यक्तिगत टीका
दरम्यान मल्लीकार्जुन खर्गे यांची मोदींवर व्यक्तिगत टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुजरात निवडणुकीच्या वेळी त्यांनी मोदींना 'रावण' असे संबोधले होते. तत्पूर्वी सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना 'मौत के सौदागर' अशी उपमा दिली होती, तर मणिशंकर अय्यर यांनी 'नीच किसम का आदमी' असा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे जेव्हा काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केली तेव्हा मतदारांनी भाजपला कौल दिलेला आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी खूप मेहनत घेतली होती, मणिशंकर अय्यर यांच्या व्यक्तिगत टीकेनंतर गुजरातमध्ये शक्य असतानाही काँग्रेसचा पराभव झाला. आता कर्नाटकातही काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात येत असताना खर्गे यांनी मोदींना विषारी साप म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटकाचा निकाल कसा लागतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
वृत्तसंस्था