राष्ट्रपती राजवटीवर नाही झाली चर्चा
#नवी दिल्ली
मणिपूरमध्ये गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारावर शनिवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. राज्यातील असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, बैठकीत राष्ट्रपती राजवटीवर चर्चा होण्याची शक्यता नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाला.
संसद भवनात झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी सहभागी झाले होते. बैठकीला तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा आणि सीपीआय(एम) खासदार जॉन ब्रिटास यांच्यासह काँग्रेस, डावे पक्षातील अनेक नेते बैठकीला उपस्थित होते.
भाजप मंत्र्याच्या घराला आग
दरम्यान, राज्यातील हिंसाचार सुरुच असून विविध राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या घरावर जमावाकडून हल्ले होत आहेत. शुक्रवारी रात्री आणखी एका नेत्याच्या घराला लक्ष्य करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. इंफाळमध्ये संतप्त जमावाने भाजपा नेते व ‘पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग अँड कन्जुमर अफेअर्स’ राज्यमंत्री एल सुसिंद्रो मेईतेई यांच्या खासगी गोदामाला आग लावली आहे. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केला. गेल्या महिनाभरात, इम्फाळ परिसरात अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर संतप्त जमावाने हल्ले केले आहेत. यामध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह, राज्याचे कॅबिनेट मंत्री नेमचा किपगेन, मणिपूरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंदास कोंथौजम, उरीपोकचे आमदार रघुमणी सिंह, सुग्नूचे आमदार के रणजीत सिंह आणि नौरिया पखंगलकपाचे आमदार एस केबी देवी आदि नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचा निशाणा
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश हे बैठकीबाबत म्हणाले की, मणिपूर ५२ दिवसांपासून जळत आहे. गृहमंत्र्यांनी आता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. खरे तर पंतप्रधान मोदींनी या बैठकीचे नेतृत्व करायला हवे होते, मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. तेथील जनतेच्या भावना समजावून घेण्यासाठी ही बैठक खरे तर इंफाळमध्ये व्हायला हवी होती. भाजपने मणिपूरच्या जनतेची निराशा केली आहे. याप्रकरणी पंतप्रधानांनी बाळगलेले मौन धक्कादायक आहे. जागतिक योग दिनानामित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साऱ्या जगाला धडे देताता, त्याचवेळी मणिपूर होरपळत असताना त्याची त्यांना दखल घ्यावी वाटत नाही, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
राहुल गांधी यांनीही या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते ट्विटमध्ये म्हणतात की, मणिपूरप्रश्नी बैठक होत असताना पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावरून ही बैठक पंतप्रधानांसाठी महत्त्वाची नसल्याचे जाणवते. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, राष्ट्रपती राजवटीवर चर्चा होण्याची शक्यता नाही.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या जनतेला संबोधित केल्यावर सरकार जागे झाले. या गंभीर समस्येवर पंतप्रधानांनी या प्रश्नांपासून दूर राहणे हा भ्याडपणा आहे.
वृत्तसंस्था