नवी दिल्ली – आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामला पोहोचले आहेत. आज प्रचारासाठी रवाना पंतप्रधानांनी दिवसाची सुरुवात दिब्रुगढ येथील एका चहाच्या मळ्याला भेट देऊन केली आणि तिथे काम करणाऱ्या महिला कामगारांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, कामाविषयी आणि अनुभवांविषयी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरव्दारे व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी दिब्रुगढमधील एका चहाच्या मळ्यात, चहाच्या मळ्यातील कुटुंबांच्या संस्कृतीची एक झलक मिळाली. आसामच्या प्रगतीमधील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रयत्नांचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांची मेहनत आणि समर्पणामुळे आसामचा गौरव वाढला आहे. या भेटीतील अनेक छायाचित्रे शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले की, ‘चहाची पाने तोडल्यानंतर महिलांनी त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगितले आणि मग आम्ही एकत्र सेल्फीही घेतल्या.”


