सग्रहीत छायाचित्र
काही पैशांसाठी पाकिस्तानी गुप्तहेर बनलेल्या ज्योती मल्होत्राबाबत मोठमोठे खुलासे होत आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणांना आणखी सजग रहावे लागणार आहे. एरव्ही इकडे-तिकडे जात व्हिडीओ काढणाऱ्या ज्योती मल्होत्राने लष्करीदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पठाणकोटला जाऊनही व्हिडीओ का काढला नाही, असा प्रश्न तपास यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे.
ज्योती एका मोठ्या हेरगिरी रॅकेट मॉड्यूलशी जोडली गेल्याचे समोर येत आहे. तिचे एकेक कारनामे ऐकून एनआयएचे अधिकारी ही केस आपल्या ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर तिने पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशशी चॅट केले होते. त्याला ब्लॅकआऊटची माहिती दिली होती. नंतर तिने ती डिलीट केली. तिने असे का केले याचा तपास सुरु आहे.
आयएसआयच्या बांगलादेश टीममध्ये सहभाग?
ज्योती बांगलादेशला जाणार होती. हल्लीच्या काळात बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढू लागली आहे. भारताच्या चिकन नेकपर्यंत पाकिस्तानी अधिकारी जाऊन आले आहेत. बांगलादेश सर्व उपकार विसरून भारताविरोधात कारस्थान रचू लागला आहे. अशातच ज्योतीने बांगलादेशसाठीच्या व्हिसाच्या अर्जाची प्रतदेखील तयार केली होती. यामध्ये तिने बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरेकडील भाग असा तात्पुरता पत्ता लिहिला होता. भारताविरोधात कारस्थान रचणाऱ्या आयएसआयच्या बांगलादेशी टीममध्ये सहभागी होण्यासाठी ती जाणार होती, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. तिथे ती एका बैठकीत भाग घेणार होती. बांगलादेशमध्ये आयएसआय नवीन टीम तयार करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. ज्योतीला पठाणकोटला नेण्यात आले, तिथे तिने काय केले हेसुद्धा तपासले जात आहे. तिने या प्रवासाचा व्हिडीओ का काढला नाही असा प्रश्नही यामागे उपस्थित होत आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या फोटो आणि एका छोट्या क्लिपवरून तिने पठाणकोटला भेट दिल्याचे समोर आले.
पठाणकोट, गोल्डन टेंपलवर हल्ल्याचा प्रयत्न...
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने पठाणकोट लष्करी तळ आणि गोल्डन टेंपलवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअर बेसची तपासणी करण्यासाठी ती तिथे गेल्याची शक्यता आहे. तसेच ज्योतीने व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड माध्यमांद्वारे गोल्डन टेंपल आणि काश्मीरमधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ व लोकेशन पाकिस्तानी एजंटना पाठवले आहेत. सध्या एनआयए आणि आयबी ज्योतीची चौकशी करत आहेत. तिची कोठडी २२ मे रोजी संपत आहे.
देशविरोधी माहिती पुरवल्याची कबुली
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती. ती सतत पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. यासंदर्भात बोलताना ज्योती म्हणाली की, माझ्याकडे ‘ट्रॅव्हल विथ-जो’ नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. मी २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेलो होतो. तिथे माझी भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. दानिशचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर संभाषण सुरू झाले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला गेले. दानिशच्या विनंतीवरून मी अली हसनला भेटले. अलीने माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. अली हसनने माझी पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट घडवून आणली आणि तिथे मी शाकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटले. मी शाकीरचा मोबाईल नंबरही घेतला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याचा नंबर ‘जाट रंधावा’ नावाने सेव्ह केला होता. शाकीर हा पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाचा अधिकारी आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांच्या संपर्कात होते. मी त्यांच्याद्वारे देशविरोधी माहिती पाठवली होती. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटल्याची कबुलीही तिने यावेळी दिली.