राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
नवी दिल्ली | शरद पवार यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. नुकतीच त्यांनी संसदीय कारकिर्दीची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत. राज्यसभेत शरद पवार यांच्यासह रामदास आठवले यांनीही शपथ घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हिलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शरद पवार यांच्यासह आता पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत दिसणार आहेत.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित १९ सदस्यांनी सोमवारी (दि.६) खासदारकीची अधिकृत शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी या सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये महाराष्ट्रातील सात दिग्गज नेत्यांचा समावेश असून, त्यांचा उच्च सभागृहातील नवा कार्यकाळ आजपासून अधिकृतपणे सुरू झाला आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये सत्ताधारी महायुतीचे सहा आणि विरोधी महाविकास आघाडीचा एक उमेदवार सभागृहात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर नियुक्त झाले आहेत.
भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने ज्योती वाघमारे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांनी पुन्हा एकदा सभागृहात स्थान मिळवले आहे.
देशातील १० राज्यांमधील ३७ रिक्त जागा भरण्यासाठी १६ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली होती. एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या सदस्यांच्या जागी हे नवीन प्रतिनिधी निवडून आले आहेत. संसदेचे सुरू असलेले अधिवेशन १६ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आले असून, उर्वरित सदस्यांचे शपथविधी याच कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत.


