अन्यथा पंतप्रधान मोदी ‘नरेंद्र पुतीन’ बनतील
#नवी दिल्ली
'जर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'नरेंद्र पुतीन' बनतील. त्यांची सध्याची कार्यपद्धती एककल्ली आहेच, पण पुन्हा जनाधार मिळाल्यास त्यांचे वर्तन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच हुकूमशाहासारखे असेल, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दिल्ली सरकारच्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात ‘रामलीला’ मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीतील ‘आप’ नेते आणि मंत्री गोपाल राय आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी या मेळाव्याला संबोधित केले.
भगवंत मान पुढे म्हणाले, देशभरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आताच नरेंद्र मोदींना भारताचा ‘मालक’ समजू लागले आहेत. १४० कोटी भारतीयांनी भारताला वाचवायचे ठरवले तरच हा देश वाचेल, अन्यथा तो नरेंद्र मोदींचा गुलाम बनेल. मोदी आणि त्यांच्या पक्षाने धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करायला सुरुवात केली आहे. त्यांना हा देश हिंदुराष्ट्र करायचा आहे, त्यामुळे या देशात नागरी संघर्ष निर्माण होणार आहे. हा प्रकार थांबवायचा असेल तर आताच सत्ताधाऱ्यांना रोखायला हवे, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. केंद्र सरकारने सेवाविषयक अध्यादेशाच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि दिल्लीतील लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावे. तसेच सरकारने हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.