विरोधकांनी काळजी करू नये, मोदीच पुन्हा होणार पंतप्रधान
#जम्मू / नवी दिल्ली
पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीची सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने अखेर दखल घेतली असून जम्मू येथील सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असा दावा केला आहे. ते म्हणाले की, आज पाटण्यात फोटो सेशन सुरू आहे. कितीही पक्ष सभेला आले तरी ते कधीच एकत्र येणार नाहीत. विरोधी पक्षनेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला आव्हान द्यायचे आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदीच पुन्हा सरकार स्थापन करतील.'
शहा म्हणाले की, आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा हुतात्मा दिन आहे. मुखर्जी यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात काम केले होते. त्यांच्या बलिदानामुळे बंगाल आज भारताचा भाग आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० ला विरोध केला. देशात दोन कायदे, दोन पंतप्रधान आणि दोन निशाण चालणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. मुखर्जी १९५३ मध्ये कलम ३७० च्या विरोधात जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले होते. येथे त्यांना धोक्याने अटक केली. त्यांची हत्या झाल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता कलम ३७० संपले आहे. त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे काश्मीर तयार होत आहे.
पाटण्यातील बैठकीवर दिल्लीत स्मृती इराणींनी कडाडून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसला हे ठाऊक आहे की ते एकटे मोदींना हरवू शकत नाहीत. त्यामुळे आता मोदींविरोधात सगळे एकवटले आहेत. १९८४ चे दंगे, आणीबाणी, भारत तेरे टुकडे होंगेचे नारे हे सगळे करून आता काँग्रेस मोहब्बतच्या दुकानाची भाषा करते आहे. काँग्रेसच्या छत्रछायेत काही असे नेते एकत्र आले आहेत ज्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीची हत्या होताना पाहिली. काँग्रेस नरेंद्र मोदींना हरवण्यात अपयशी ठरते आहे. त्यामुळे त्यांना आपल्याच एकेकाळच्या विरोधकांची मदत घ्यावी लागते आहे.
मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरही स्मृती इराणी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ वेळा स्टँडिंग ओव्हेशन दिले गेले. भारत आणि अमेरिकेत अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. सुरक्षा करार, सेमी कंडक्टर असे महत्त्वाचे करार झाले. भारतात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे.
पाटणा बैठकीवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आज पाटण्याला पोहोचले आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ते शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही. काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली तर मी माझे दुकान बंद करेन. आज बाळासाहेब ठाकरे विचार करत असतील की दुसरे कोणी नाही तर माझ्याच मुलाने शिवसेनेचे दुकान बंद केले.
वृत्तसंस्था