‘युपी मे का बा’ फेम लोकगायिका नेहासिंह यांना नोटीस
#नवी दिल्ली
‘युपी मे का बा’ या लोकगीताने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या लोकगायिका नेहासिंह राठोड यांना गाण्याबद्दलच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे आपण घाबरलो नसून मी केवळ एक लोकगायिका असल्याची प्रतिक्रिया नेहासिंह यांनी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांच्या विरोधात आपण एक सामान्य नागरिक असून त्यांच्या मतासाठी धोका असलेल्या प्रत्येकाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न जात असून आपण त्याला बळी पडणार नाही. अशा प्रकारे नोटीस बजावणे लोकशाहीविरोधात असून विरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे नेहासिंह यांनी म्हटले आहे.
नेहासिंह म्हणतात, मी गाण्याच्या बाजूने असून ते गाण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही. मला घाबरवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. याबाबत कायदेशीर मार्ग स्विकारण्याबाबत मी वकिलांशी चर्चा करणार आहे. नोटीस देण्यापूर्वी पोलिसांनी आपल्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, माझ्या पाठीमागे पोलीस दल लावण्याऐवजी इतरत्र पोलिसांचा वापर केला असता तर राज्यातील स्थिती एवढी वाईट झाली नसती.
विशेष म्हणजे नेहा यांनी अलीकडेच ‘युपी मे का बा’ गाण्याची नवी आवृत्ती प्रसिद्ध केली असून त्यात त्यांनी ४५ वर्षिय महिला प्रमिला दीक्षित यांची कथा सांगितली आहे. प्रमिला यांच्या झोपडीला आग लागल्याने त्यात त्यांच्या वीस वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत.
या गाण्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला असून मंगळवारी नोटीस पाठवली आहे. राठोड यांना गाण्याच्या बाबतीत विचारणा करावयाची असून ही गीत कसे तयार केले अशी विचारणा केली आहे. तसेच गाण्याबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून त्याला तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले असून समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये या गाण्याच उल्लेख करत पुढील निवडणुकीवेळी भारतीय जना पक्ष सत्तेतून बाहेर जाईल असा स्पष्ट इशारा अखिलेश यांनी दिला आहे. वृत्तसंंस्था