Marraiges : प्रेमविवाहामुळेच होतात सर्वाधिक घटस्फोट

विवाह हा भलेही संसार असेल, अलीकडील काळात हा संस्कार स्वतःच्या मर्जीने पार पाडण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. विशेषतः प्रेमविवाहांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. मात्र हे प्रेमविवाह टिकत नसल्याने घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे. नेमका हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अधोरेखित केला आहे. प्रेमविवाहांमधूनच सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर येत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 18 May 2023
  • 05:57 pm
प्रेमविवाहामुळेच होतात सर्वाधिक घटस्फोट

प्रेमविवाहामुळेच होतात सर्वाधिक घटस्फोट

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, घटस्फोट हा अखेरचा पर्याय असल्याचे सांगत सामोपचाराने एकत्र येण्याचा सुचवला पर्याय

#नवी दिल्ली

विवाह हा भलेही संसार असेल, अलीकडील काळात हा संस्कार स्वतःच्या मर्जीने पार पाडण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. विशेषतः प्रेमविवाहांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. मात्र हे प्रेमविवाह टिकत नसल्याने घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे. नेमका हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अधोरेखित केला आहे. प्रेमविवाहांमधूनच सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर येत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती गवई यांनी हे मत मांडले.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर एका वैवाहिक वादाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी संबंधित दाम्पत्याचा विवाह हा 'लव्ह मॅरेज' असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना न्यायमूर्ती गवई यांनी 'लव्ह मॅरेजमधूनच घटस्फोटांची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत' अशी टिप्पणी केली. दरम्यान, या खटल्यामध्ये  न्यायालयाने दोघांमध्ये सामोपचार घडवून आणण्याचा पर्याय सुचवला. मात्र पतीला हा निर्णय मान्य नव्हता. त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या  नुकत्याच दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र या खंडपीठाने दोन्ही बाजूंना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले होते पाच सदस्यीय खंडपीठ ?

दरम्यान या महिन्यातच यापूर्वी झालेल्या एका सुनावणीत न्यायालयाने या विषयावर सविस्तर निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालय घटनेच्या कलम १४२ (१) अंतर्गत घटस्फोट मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करू शकते. अशावेळी घटस्फोटाला पती अथवा पत्नीचा विरोध असला तरी न्यायालय हे विवाह संबंध रद्द ठरवू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.  न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे. विवाह विच्छेदनाचा निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाला तशी खात्री पटणे गरजेचे आहे. एखाद्या जोडप्याचे वाद सामोपचाराच्या, तडजोडीच्या पलीकडे गेले असतील, त्यांच्यात पुन्हा एकत्र येण्याच्या, नांदण्याच्या सगळ्या शक्यता संपुष्टात आल्या असतील तरच न्यायालय तसा निर्वाळा देऊ शकते. अशा अवस्थेत दोन व्यक्तींच्या हितासाठी वेगळे होणेच उत्तम पर्याय ठरत असल्याचे हे खंडपीठ म्हणाले आहे.  

घटस्फोटापूर्वी अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. यात विवाहानंतर पती-पत्नी किती दिवस एकत्र राहिले आहेत, त्यांच्यात वाद का व कशामुळे निर्माण झाले आहेत, त्यांच्यात शारीरिक संबंधात येणाऱ्या अडचणी, त्यांनी एकमेकांवर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या आरोपांचे स्वरूप या सगळ्यांचा विचार करणे अनिवार्य ठरते. मात्र जर सामोपचाराने दोन व्यक्ती एकत्र येत असतील, तर त्या शक्यता आजमावून पाहायला हव्यात. शेवटची शक्यता म्हणूनच घटस्फोटाचा पर्याय निवडायला हवा, असे निरीक्षण या पाच सदस्यीय खंडपीठाने नोंदवले आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest