बांगलादेशी समजून जोडप्याला टाकले दहा महिने तुरुंगात
#बंगळुरू
बांगलादेशी असल्याचे समजून पश्चिम बंगालमधील एका जोडप्याला दोन वर्षांच्या मुलीसमवेत जवळ जवळ दहा महिने येथील तुरुंगात काढावे लागले. हे जोडपे पश्चिम बंगालच्या झौग्राममधील तेलेपुकुर येथील असून मजूर म्हणून काम करण्यासाठी ते येथे आले होते. बंगळुरू पोलिसांनी त्यांना बांगलादेशी म्हणून तुरुंगात टाकले.
जवळ जवळ दहा महिने म्हणजे ३१० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्यांना जामीन मिळाला, मात्र जामीन रक्कम भरली नसल्याने २४ मे रोजी त्यांची सुटका झाली. गुरुवारी हे जोडपे पश्चिम बंगालकडे निघाले.
पलाश आणि शुक्ला अधिकारी असे या जोडप्याचे नाव असून जून २०२२ मध्ये बंगळुरूला आले २७ जुलै रोजी पोलिसांनी त्यांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून अटक केली. दोघांनीही पूर्व बर्दवानच्या जमालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहात असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नी दोघेही बंगळुरू येथील मराठाहळ्ळी येथील कचरा वर्गीकरण युनिटमध्ये काम करत होते. वडील पंकज आणि आई सबिता हेदेखील त्यांच्यासोबत राहात होते. काही दिवसांनी बंगळुरू पोलिसांचे पथक पलाशच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी बर्दवानमधील घरी पोहोचले. जमालपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेऊन कागदपत्रे तपासली. अटकेची माहिती मिळताच पलाशच्या नातेवाइकांनी बंगळुरू गाठून जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. अटकेच्या वेळी ते भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे दाखवू शकले नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. जामीनपत्र भरल्यानंतरच हे जोडपे गुरुवारी हावड्याला रवाना झाले.