मणिपूर पुुन्हा पेटले, संघर्षात नऊ ठार
#इंफाळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चार दिवस तळ ठोकून केलेली शिष्टाई बिनकामाची ठरली असून मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार उफाळून आला आहे. मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे नव्याने उफाळलेल्या हिंसाचारात मंगळवारी रात्री तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान एक गट मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील ऐगिजांग गावात शिरला. त्यांच्याकडून गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली. गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरला भेट देऊन शांतता समिती नेमली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि इतरांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांच्या मध्यस्तीनंतरही राज्यात हिंसाचार सुरू आहे.
हिंसाग्रस्त भागात हल्लेखोर शिरल्याने सुरक्षा दलाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईमुळे चकमक उडाली. गावात रात्री १०-१०.३० च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये नऊ लोक ठार आणि १० जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे, हिंसाग्रस्त भागात आता आसाम रायफल्स तैनात केली असून सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आली असल्याचाही माहिती पोलिसांनी दिली.
३ मे पासून पर्वतीय भागातील कुकी समाज आणि इम्फाळ खोऱ्यातील मैतई समुदाय यांच्यात सुरु असलेल्या हिंसाचारात किमान ११५ जण मारले गेले आहेत. या हिंसाचारात जवळपास ४० हजार लोक विस्थापित झाले आहेत. मैतई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला विरोध करताना हा हिंसाचार भडकला. हळूहळू हिंसाचाराचा भडका संपूर्ण राज्यभर पसरला. परिणामी अधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आणि इंटरनेटही बंद केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.
सोमवारी, मैतेई आणि कुकी समुदायातील प्रमुख नागरी संस्थांनी राज्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या शांतता समितीचा भाग होण्यास नकार दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तणाव कमी करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून पॅनेलची स्थापना केली होती.
मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात ईशान्य समन्वय परिषदेचे अध्यक्ष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरमा मणिपूरमधील ताज्या परिस्थितीबाबत शहा यांना अहवाल देतील. माध्यमांच्या वृत्तानुसार गृहमंत्र्यांनी सरमा यांच्यावर मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांची चौकट तयार करण्याचे काम सोपवले होते. सरमा १० जून रोजी मणिपूरला गेले होते, जिथे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मंगळवारी पहाटे राष्ट्रीय आसाम रायफल्सचे कर्मचारी सिंगजमेई गुमनाम लिकाई आणि मोइरांगखोममध्ये खाजगी वाहनांच्या खिडक्या आणि निवासी घराच्या काचा फोडताना दिसले. याचा एक व्हीडीओ समोर आला आहे. त्यांनी १० वाहनांच्या काचा आणि दोन घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. हे जवान मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास सिंगाजामेईहून मोइरांगखोमच्या दिशेने जात असताना त्यांनी काचा फोडल्याचं सांगण्यात येत आहे.
१० जून रोजी राज्यातील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा जून महिन्याच्या सुरुवातीला येथे ४ दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान राज्याचे डीजीपी पी डोंगल यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी राजीव सिंग यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहे.