सग्रहीत छायाचित्र
बिजापूर : छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित भागांमध्ये सुरक्षा दलांनी चालवलेल्या जोरदार मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. आज सकाळपासून अबूझमाड परिसरात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत २० नक्षलवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अद्याप सुरू असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही चकमक नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड)च्या जवानांनी संयुक्तपणे सुरू केली आहे. जवानांनी नक्षलवाद्यांच्या गुप्त अड्ड्यावर हल्ला करत त्यांना मोठा हादरा दिला आहे. गोळीबार अजूनही सुरू असून, काही वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांना सुरक्षा दलांनी घेरल्याचं वृत्त आहे.
विशेष म्हणजे, या चकमकीत नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस वसावा राजू उर्फ वसवी याच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे. वसावा राजू हा दंडकारण्यातील नक्षल चळवळीचा मूळ नियोजक मानला जात होता. अनेक वर्षांपासून तो माड परिसरात लपून राहत होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं.
सुरक्षा दलांनी वसावा राजूचा खात्रीशीर ठावठिकाणा मिळवून आज त्यांच्या अड्ड्यावर कारवाई केल्याची माहिती मिळते. जर त्याचा मृत्यू अधिकृतपणे स्पष्ट झाला, तर ही सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठी रणनीतिक कामगिरी ठरेल. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, चकमकीनंतर सर्च ऑपरेशनही सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारकडून या यशाबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या घटनेचा नक्षल चळवळीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.