नवी दिल्ली – गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसताना दिसून येत आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे जगातील अनेक देशांत ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता आहे. भारतातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता भारतातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
तेल विपणन कंपन्यांनी प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतीत १९५ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर्सची किरकोळ किंमत २ हजार ३१ रुपये, दिल्लीमध्ये २ हजार ७८ रुपये, कोलकाता इथं २ हजार २०८, आणि चेन्नईमध्ये २ हजार २४६ रुपये झाले आहेत.
गृहिणींना दिलासा…
व्यावसायिक सिलिंडरचे दर आकाशाला भिडले असले तरी, गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरमध्ये ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर सध्या दिल्लीत हा सिलिंडर ९१३ रुपयांना मिळत असून तीच किंमत कायम ठेवण्यात आली आहे.


