नितीशकुमार यांच्या पुढाकाराला जीतनराम मांझीचा झटका
#पाटणा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २३ जून रोजी पाटण्यात विरोधकांची भव्य बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच नितीश यांच्या सरकारला जोरदार धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चाचे मंत्री संतोष मांझी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
नितीश कुमार यांच्या पक्षासोबत युतीत अनुसूचित जाती-जमाती कल्याणमंत्री राहिलेल्या सुमन यांनी राजीनाम्यापूर्वी अर्थमंत्र्यांशी दीर्घ चर्चादेखील केली. दरम्यान संतोष सुमन ऊर्फ संतोष मांझी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य किंवा माहिती देण्यात आलेली नाही. राजीनामा स्वीकारल्यास तो राज्यपालांकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर संतोष सुमन म्हणाले की, आम्हाला विरोधी एकजुटीसाठी आयोजित बैठकीचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चा यांची आघाडी सत्तेवर आहे.
आमची ओळख नाहीशी करून विलीनीकरण अशक्य
मांझी यांच्या निर्णयामागे नितीशकुमार यांचा अट्टहास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आमच्या पक्षाची स्वतंत्र ओळख पुसून जेडीएसमध्ये विलीन होणे आम्हाला मंजूर नाही, अशी त्यांनी भावना व्यक्त केली आहे. पक्ष म्हणून आमची स्वतंत्र अस्मिता आहे, त्यामुळे हिंदुस्तानी आवामी मोर्चाचे कुटुंब फोडण्याऐवजी सरकार सोडणे हाच शेवटचा पर्याय होता. आम्ही पक्षासाठी मेहनत घेत आहोत, त्यामुळे विलीनीकरणाचा पर्याय निवडणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हीही सहकारी पक्ष आहोत, पण आम्हाला बैठकीपासून दूर ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी (१२ जून) माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी पाटणा येथे होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे उघडपणे मान्य केले होते. काही दिवसांपासून मांझी सातत्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढणार नसल्याचे सांगत होते, मात्र संतोष मांझी यांच्या या निर्णयानंतर जीतनराम आपला शब्द पाळणार नसल्याचे उघड झाले आहे.
वृत्तसंस्था