झारखंडमध्ये वाहतेय सोने देणारी नदी
#रांची
विचार करा, तुम्ही एखाद्या नदीत हात घालून त्यातली वाळू हातात घेतली आणि हातात सोन्याचे कण आढळून आले तर! होय, ही कविकल्पना नाही तर वास्तव आहे. हे खरे होऊ शकते आणि तेही आपल्या भारतात. भारतात अशी एक नदी आहे जिच्यातून सोने निघते.
ही नदी झारखंड राज्यातली आहे, या नदीचे नाव स्वर्णरेखा असे असून ही रत्नगर्भा परिसरात आहे. या नदीतून सोने काढले जाते. ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या काही भागातून वाहते. काही ठिकाणी या नदीला 'सुवर्णरेखा' असेही म्हटले जाते. या नदीतल्या वाळूतून अनेक वर्षांपासून सोने काढले जात आहे. या नदीच्या परिसरातले लोक या सोन्यावरच आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. स्वर्णरेखा नदी दक्षिण-पश्चिम वाहिनी असून नगडी गावातल्या रानी चुआ या ठिकाणाहून उगम पावते आणि बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. ही नदी साधारण ४७४ किलोमीटर लांबीची आहे.
स्वर्णरेखा आणि तिची उपनदी असलेल्या करकरी या नदीमध्ये सोन्याचे कण सापडतात. सोन्याचे कण करकरी नदीतून वाहून स्वर्णरेखा नदीत पोहोचतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. करकरी नदी ३७ किलोमीटर लांबीची आहे, पण या दोन्ही नद्यांमध्ये सोन्याचे कण कुठून येतात, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. झारखंडमध्ये नदीच्या परिसरात राहणारे लोक वाळूतून सोने काढतात आणि जमा करतात. एक व्यक्ती महिन्यात सोन्याचे केवळ ७० ते ८० कणच जमा करू शकते. सोन्याच्या या कणांचा आकार तांदळाच्या दाण्याइतका असतो. इथले आदिवासी लोक पावसाळा वगळता वर्षभर हेच काम करत असतात.