मशिदीत घुसून जवानांची मुस्लिमांना ‘जय श्री राम’ च्या घोषणांची जबरदस्ती
#श्रीनगर
भारतीय लष्कराच्या जवानांनी मशिदीत घुसून मुस्लीम लोकांना जबरदस्तीने जय श्री राम अशा घोषणा द्यावयाला लावल्याचा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आरआर बटालियनचे सैनिक पुलवामा येथील मशिदीत घुसले आणि त्यांनी मुस्लीम लोकांना घोषणा देण्यास भाग पाडले.
मेहबूबा ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रीय रायफल्सचे जवान पुलवामा येथील मशिदीत घुसले. त्यांनी तेथे उपस्थित मुस्लिमांना जय श्री राम अशा घोषणा देण्यास भाग पाडले. ही बातमी ऐकून मला धक्का बसला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये असताना असे कृत्य होत असेल तर धक्कादायक आहे. माझ्या मते हे कृत्य केवळ चिथावणी देण्यासाठी केले गेले आहे.
मेहबूबा यांनी चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजीव घई यांनी १४ जून रोजी श्रीनगरमध्ये चिनार कॉर्प्सची सूत्रे आपल्या हाती घेतली. पाकिस्तानच्या सीमेवर होणारी घुसखोरी रोखण्याची आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, मोदी देशाबाहेर जातात तेव्हा ते गांधींबद्दल बोलतात, त्यांची पूजा करायला सांगतात. दुसरीकडे देशात परत आल्यावर गांधींचे मारेकरी गोडसेची पूजा करतात.
मेहबूबा मुफ्ती शिवलिंगाचा जलाभिषेक करून प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्या ४ मार्च रोजी पूंछमधील नवग्रह मंदिरात पोहोचल्या होत्या. तेथल्या शिवलिंगाला जल अर्पण केले होते.