मुंबई | इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारांसह सोन्याच्या किमतींवरही झाला असून, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) व देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
-MCX वर सोन्याच्या दरांनी पार केला १ लाखाचा टप्पा
गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या दरांनी MCX वर सोन्याचा भाव १,००,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ६ जून २०२५ रोजी ५ ऑगस्टला सोन्याचा दर ९७,०३६ रुपये प्रति १० ग्रॅम होता. अवघ्या आठवड्याभरातच तो वाढून १३ जून रोजी १,००,६८१ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच एका आठवड्यातच सोन्याचा दर तब्बल ३,६४५ रुपयांनी वाढला आहे.
- देशांतर्गत बाजारातही झपाट्याने वाढ
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, देशांतर्गत बाजारातही २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सातत्याने वाढतो आहे. ६ जून रोजी प्रति १० ग्रॅम ९८,१६३ रुपये असलेला दर, १३ जून रोजी ९९,०६० रुपयांवर पोहोचला. आज, १५ जून रोजी हा दर ९९,१७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
- इतर कॅरेटचे दर (१३ जून २०२५ नुसार):
२२ कॅरेट: ₹९६,६८० / १० ग्रॅम
२० कॅरेट: ₹८८,१६० / १० ग्रॅम
१८ कॅरेट: ₹८०,२४० / १० ग्रॅम
१४ कॅरेट: ₹६३,८९० / १० ग्रॅम
हे दर IBJA द्वारे देशभरासाठी जारी केले जातात आणि दागिने बनवताना यावर घडणावळ व GST वेगळा आकारला जातो.
- जागतिक अस्थिरतेचा परिणाम
इस्रायल आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जागतिक अस्थिरता वाढली असून, गुंतवणूकदारांचा कल पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक माध्यमांकडे वळत आहे. त्यामुळेच सोन्याच्या मागणीला जोर चढला असून, भावात प्रचंड उसळी पाहायला मिळत आहे.
विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे सोन्याला सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे, तिथे या वाढत्या किमतींमुळे सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार निर्माण झाला आहे.