भारतीय मिसळ बनली 'जगात भारी'
#नवी दिल्ली
जगातील पारंपरिक शाकाहारी पदार्थांच्या यादीत भारताच्या मिसळ या पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी टेस्ट ॲटलासकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. 'टेस्ट ॲटलास' हा जगातील पारंपरिक पदार्थांचा विश्वकोष समजला जातो. त्यामुळेच देशभरात विशेषतः महाराष्ट्रात चवीने खाल्ली जाणारी मिसळ आता जागतिक नकाशावरही पोहोचली आहे.
मिसळ पुण्याची की कोल्हापूरची हा वादाचा विषय असू शकतो, मात्र तिची चटकदार चव सगळ्यांनाचा आवडते. प्रत्येक प्रांतानुसार तिची चव जराशी बदलत जाते. मग त्यात नाशिक, मुंबई, खान्देशी अशा इतरही काही ठिकाणांचा समावेश आहे. पण मिसळ कुठलीही असो तिचा आनंद खवय्ये अगदी मनसोक्त लुटत असतात. महाराष्ट्रात मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मिसळचा समावेश असतो. अगदी खास बेत म्हणून देखील मिसळीचा बेत केला जातो.
मिसळ हा आता महाराष्ट्रापुरता नव्हे, देशापुरता नव्हे तर जगासाठी विशेष पदार्थ ठरला आहे. जगातील ५० पारंपरिक शाकाहारी पदार्थांची यादी टेस्ट ॲटलासने प्रसिध्द केली आणि त्यात मिसळची वर्णी लागली. त्यात मिसळ ही ११ व्या स्थानी आहे. त्यामुळे आता मिसळ या खाद्यपदार्थाला व्हेगन म्हणजेच संपूर्ण शाकाहारी पदार्थ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जगातील कोणत्याही देशातील पारंपरिक पदार्थ, त्यात वापरले जाणारे पारंपरिक साहित्य या सगळ्याची माहिती टेस्ट ॲटलासच्या संकेतस्थळावर मिळते. तसेच तुम्हाला एखाद्या देशाचे पारंपरिक पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट हवे असेल तर त्याची माहितीदेखील टेस्ट ॲटलासवर तुम्हांला उपलब्ध होते.
वृत्तसंस्था