संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली - ब्राझीलमध्ये झालेल्या पशु मेळ्यात भारतीय जातीची गाय ४० कोटी रुपयांना विकली गेली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या कोणत्याही गायीसाठी लावण्यात आलेली ही सर्वात महागडी बोली आहे. ही बोली ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे लागली, जिथे एका ग्राहकाने व्हिएटिना-१९ नावाच्या गायीसाठी इतकी मोठी बोली लावली. गायीचे वजन ११०१ किलो असून या जातीच्या इतर गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. नेल्लोर जातीची ही गाय आहे. ही जात भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे आढळते. ही गाय तीच्या शारीरिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. या गायीने मिस साउथ अमेरिकाचा किताबही जिंकला.
चांगल्या जातीच्या गायी निर्माण व्हाव्यात म्हणून लोकांनी या गायीची संतती जगातील अनेक देशांमध्ये नेली आहे. म्हणूनच जेव्हा या गायीसाठी बोली लावण्यात आली तेव्हा एका ग्राहकाने ४० कोटी रुपयांपर्यंतची मोठी किंमत देण्याचा निर्णय घेतला. नेल्लोर जातीच्या गायींना ओंगोल म्हणूनही ओळखले जाते. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या अत्यंत कठीण आणि उष्ण परिस्थितीतही जगू शकतात. त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही. याशिवाय, नेल्लोर जातीच्या गायींची रोगप्रतिकारक शक्ती देखील उत्कृष्ट आहे. यामुळेच जगभरात तीची लोकप्रियता खूप जास्त आहे.
या गायींची जास्त काळजी घ्यावी लागत नसून पांढऱ्या केसांचा आणि खांदा उंच असलेल्या या गायींमध्ये उंटांप्रमाणे जास्त काळ अन्न आणि पाणी साठवण्याची विशेष क्षमता असते. यामुळे, त्यांना वाळवंटात आणि उष्ण भागात राहणे सोपे जाते. यामुळेच जगभरात नेल्लोर जातीच्या गायींची मागणी वाढली आहे. कधीकधी चारा इत्यादींअभावी प्राण्यांना जगणे कठीण होते. अशा परिस्थितीत, या गायी एक चांगला पर्याय आहेत. या गायी चरबी साठवतात. यामुळे कठीण परिस्थितीतही त्यांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही.
या गायींची प्रतिकारशक्ती इतकी आहे की त्यांना कमीत कमी वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. देशात साहिवाल, नेल्लोर, पेंगनूर आणि बद्री गायींसह अशा अनेक जाती आहेत, ज्यांना भारतासह जगभरातील देशांमध्ये मोठी मागणी आहे. ब्राझीलमध्ये नेल्लोर जातीच्या गायींचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते.