कर्नाटकची राजधानी आणि भारताची सिलिकॉन व्हॅली असलेल्या बंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. रविवारी (दि. १८) संध्याकाळपासून सोमवारी (दि. १९) पहाटेपर्यंत या १२ तासांत बंगळुरूमध्ये सुमारे १३० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५०० घरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील टोनी भागातील अनेक रस्त्यांचे जलमार्गात रूपांतर झाले आहे. तसेच शहरातील अंडरपास आणि उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बंगळुरूच्या अनेक भागात सार्वजनिक बस सेवाही पावसामुळे ठप्प झाल्या आहेत.
कमी दाबाच्या दोन प्रणालींच्या एकत्रीकरणामुळे शहराच्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागात वादळासह मुसळधार पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान रविवार ते सोमवारमध्ये १२ तास पडलेला पाऊस दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती बंगळुरू महापालिकेचे मुख्य आयुक्त महेश्वर राव यांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता दक्षिण बेंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील मधुवना अपार्टमेंटमध्ये साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढताना मनमोहन कामथ (६३) आणि सुरक्षा रक्षकाचा मुलगा दिनेश (१२) हे दोघेही विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडले.
पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कामथ यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार आणली. त्याचवेळी सुरक्षारक्षक भरत यांचा मुलगा दिनेश कामथ यांच्या मदतीसाठी आला होता. त्यावेळी मोटार चालू करताच दोघांनाही विजेचा धक्का बसला. यानंतर इतर रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश तीन महिन्यांपूर्वी त्याच्या पालकांसह नेपाळहून बंगळुरूला आला होता.
दुसरीकडे व्हाइटफील्डमधील हाऊसकीपिंग कर्मचारी शशिकला डी (३२), यांचा त्यांच्या कार्यालयातील इमारतीची भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दरम्यान बंगळुरूमध्येचे खासदार पी. सी. मोहन यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पावसामुळे बंगळुरूमधील इन्फोसिससह सर्व कंपन्यांनी दोन दिवस घरून काम करण्याची घोषणा करावी.