'एआय'च्या नियंत्रणात भारताची भूमिका निर्णायक
#नवी दिल्ली
'ओपनएआय' कंपनीने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये चॅट जीपीटी तंत्रज्ञान बाजारात दाखल केले होते. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी नुकताच जी- २० परिषदेची जबाबदारी असणाऱ्या अमिताभ कांत यांच्याशी संवाद साधला. जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यात भारत निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे सांगत ऑल्टमन यांनी, जी- २० परिषदेतील या संदर्भातील परिसंवादात मी भारताच्या भूमिकेबाबत आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सॅम ऑल्टमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा कंपनीने 'चॅट जीपीटी' सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुरू झालेल्या एआय क्रांतीची सूत्रे ऑल्टमन यांच्याकडे होती. तसेच ते आयआयटी दिल्ली येथे भेट देणार आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञानाचा विकास, राष्ट्रीय मालमत्ता या बाबतीत भारताने केलेली कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कौतुकास्पद आहे, यापुढील काळात या तंत्रज्ञानाचा इतर सेवांमध्ये कसा एकात्मिक वापर करता येईल, यावर सरकारने भर दिला पाहिजे. आम्ही सर्व सरकारी सेवा अधिक अद्ययावत व सुरक्षित करण्यासाठी लँग्वेज लर्निंग मॉडेल (एलएलएम) वापर करण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. न्यूक्लिअर फ्युजन टेक्नॉलॉजीबद्दल आपण उत्सुक असल्याचा खुलासा सॅम ऑल्टमन यांनी केला. ओपनएआयचे सीईओ ऑल्टमन यांनी 'हेलियन एनर्जी'मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जगातील पहिला फ्युजन प्रकल्प तयार करण्याची कंपनीची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जा तयार करण्यात येणार आहे.