बिहारमधील खटल्यात राहुल गांधी यांना दिलासा
#पाटणा
मोदी आडनावावरून बिहारमध्ये दाखल झालेल्या बदनामीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाटणा उच्च न्यायालयाने १५ मे पर्यंत दिलासा दिला आहे. या अगोदर खालच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयातील सुनावणीला स्थगिती दिली आहे.
२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या मोदी आडनावावरून केलेल्या टीकेने आपली बदनामी होत असल्याची तक्रार बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दाखल केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी राहुल गांधी यांनी २२ एप्रिलला न्यायालयाकडे केली होती.
राहुल गांधी यांचे वकील वीरेंद्र राठोड म्हणाले की, मोदी यांनी दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. जेव्हा सुरतच्या न्यायालयात अशाच आशयाची याचिका दाखल झालेली असताना पुन्हा त्याच आशयाची याचिक दाखल करणे बेकायदेशीर आहे. आता पुढील सुनावणी १५ मे रोजी आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत खालच्या न्यायालयातील सर्व प्रक्रियांना कोर्टाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आपण युक्तिवाद करू शकता असे कोर्टाने आपल्याला सांगितले असल्याचे सुशीलकुमार मोदी यांचे वकील एस. डी. संजय यांनी सांगितले.
बदनामी प्रकरणीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. यामुळे नियमानुसार राहुल यांनी राजधानी दिल्लीतील १२, तुघलक रोडवरील बंगला शनिवारी खाली केला. अमेठी येथून लोकसभेवर निवड झाल्यानंतर राहुल यांना हा बंगला देण्यात आला होता.