अहमदाबाद विमान अपघातासंबधी महत्त्वाची अपडेट; ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला, तपासाला मिळणार गती

अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा काल (१२ जून) रात्री घडलेला भीषण अपघात संपूर्ण देशाला हादरवणारा ठरला. या दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचा आणि काही इंटर्न डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Fri, 13 Jun 2025
  • 07:56 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा काल (१२ जून) रात्री घडलेला भीषण अपघात संपूर्ण देशाला हादरवणारा ठरला. या दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचा आणि काही इंटर्न डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर या घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या तपासात आता एक मोठी प्रगती झाली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला आहे.

वसतिगृहाच्या छतावर सापडला ‘ब्लॅक बॉक्स’ 

ही अत्यंत महत्त्वाची आणि टिकाऊ यंत्रणा डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या छतावर सापडली, जिथे हे विमान जोरात आदळले होते. ब्लॅक बॉक्स सापडल्याने आता तपास अधिक सखोल आणि नेमका होणार असून, अपघाताच्या तांत्रिक व मानवी कारणांचा उलगडा लवकर होण्याची शक्यता आहे.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

‘ब्लॅक बॉक्स’ ही विमानातील अत्यावश्यक डेटा नोंदवणारी यंत्रणा असते. यामध्ये दोन मुख्य घटक असतात:

डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR): यात विमानाचा वेग, उंची, इंजिन कार्यप्रदर्शन, दिशा, आणि इतर अनेक तांत्रिक पॅरामीटर्स रेकॉर्ड होतात.

कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR): यात वैमानिकांचे एकमेकांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संभाषण, तसेच कॉकपिटमधील इतर आवाज नोंदवले जातात.

 ही यंत्रणा तीव्र उष्णता, अपघातजन्य धक्का आणि पाण्याचा दाब सहन करू शकते, त्यामुळे ती अपघातानंतरही सहसा सुरक्षित राहते.

AAIB आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तपासात सहभागी

भारतातील एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)च्या अधिकाऱ्यांनी गुजरात सरकारच्या सुमारे ४० जणांच्या सहाय्याने हे ब्लॅक बॉक्स शोधून काढले. यासोबतच अमेरिका आणि ब्रिटनमधील विमान अपघात तज्ज्ञ देखील या तपासात सक्रिय सहभागी झाले आहेत.

पुढील तपासात काय अपेक्षित?

ब्लॅक बॉक्समधून मिळणारी माहिती विमानाच्या शेवटच्या काही क्षणांची स्पष्ट प्रतिमा देऊ शकते. या डेटावरून तांत्रिक बिघाड, मानवी चुका, हवामानस्थिती यातील कोणते घटक जबाबदार होते, याचा तपशीलवार अभ्यास होईल. ही माहिती समोर आल्यावर विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Share this story

Latest