संग्रहित छायाचित्र
#नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर घटक पक्षाच्या नेत्यांनी आपले विचार मांडले. त्यात संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे भाषण सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. गेल्या काही वर्षांत अनेकदा भूमिका बदलणाऱ्या नितीशकुमार यांनी भाषणात मात्र आपण नेहमीच मोदी यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
शुक्रवारी (दि. ७) झालेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत महाआघाडीच्या १३ नेत्यांनी भाषणे केली, पण सर्वाधिक चर्चा झाली ती नितीश यांच्या भाषणाची. कधी एनडीएसोबत तर कधी एनडीएविरोधी भूमिका घेणाऱ्या नितीशकुमार यांना पलटूराम म्हणून सोशल मीडियावर कायम ट्रोल केले जाते. त्यातच आपल्या भाषणात मी कायम मोदींसोबत आहे, असे वक्तव्य केल्यानंतर देशभरात नितीशकुमार यांचे भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून सोशल मीडियावर त्यांची फिरकी घेतली जात आहे.
मोदी यांना उद्देशून नितीशकुमार म्हणाले, ‘‘आम्ही कायमस्वरूपी मोदी यांच्यासोबत असू. जे आता कुठे कुठे थोडेसे निवडून आलेले आहेत, ते आता पुढच्या वेळी पराभव पत्करतील. त्या लोकांनी कोणतेही काम केलेले नाही. तुम्ही देशाला पुढे घेऊन जाल. ही आनंदाची बाब आहे. तुमचा शपथविधी सोहळा लवकरात लवकर पार पडो. आम्हाला तर ते आजच हवे आहे. याचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे. इकडे-तिकडे कोणाला काय करायचंय यात फायदा नाही. प्रत्येकजण तुमच्या नेतृत्वाचे अनुसरण करेल.’’ एनडीएच्या बैठकीपूर्वी नितीशकुमार यांनी दिल्लीत जेडीयूच्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. यात सर्व निवडून आलेले खासदार सहभागी झाले. सुमारे एक तास ही बैठक चालली.
बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने प्रमुख चिराग पासवान यांनीही पंतप्रधान नेंद्र मोदी यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. तुमच्यामुळे एनडीएला दणदणीत विजय मिळाला आहे. तुमच्या इच्छाशक्तीमुळेच हा विजय झाला आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. परिसरात तुमच्या नावाने जो उत्साह दिसतो तो अभिमानास्पद आहे. तुमच्यामुळेच आम्ही जगासमोर म्हणतो की देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून आलेल्या प्रस्तावात माझ्या लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा आहे.’’ तत्पूर्वी सकाळी चिराग यांनी आपल्या पाच खासदारांसोबत बैठक घेतली, त्यात चिराग यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
बिहारचे माजी पंतप्रधान आणि हिंदूस्तानी अवामी मोर्चा (सेक्युलर) या पक्षाचे सर्वेसर्वा तीजनराम मांझी यांनीही मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला. एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून मोदी यांना नामनिर्देशित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन त्यांनी केले. ‘‘मी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध नेते नरेंद्र मोदी यांच्या नावाचे समर्थन करतो. ज्या दशरथ मांझी यांनी २४ वर्षे हातोडा आणि छिन्नीने डोंगर कापला, आम्ही त्याच कुटुंबातील आहोत. आम्ही सतत मोदीजींसोबत राहू,’’ अशी ग्वाही मांझी यांनी दिली. वृत्तसंंस्था
मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न
भाषण संपवून नितत्कुमार जेव्हा स्टेजवर आले, तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींचे चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. नितीशकुमार त्यांच्या पायाला हात लावण्यासाठी सरसावताच मोदींनी त्यांचे दोन्ही हात धरले. यादरम्यान दोघांमध्ये संवाद झाला. नितीशकुमार यांनी मोदींना अभिवादन केले. हा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नितीशकुमार म्हणाले, ‘‘आमचा पक्ष भारताच्या पंतप्रधानपदासाठी भाजप संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो. ते १० वर्षे पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होणार आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली आहे आणि आशा आहे की ते पुढील वेळी सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करतील.’’