अतिक अहमदची माहिती मारेकऱ्यांना कशी मिळाली?
#नवी दिल्ली
गुन्हेगार-राजकारणी अतिक अहमद याला नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर का नेण्यात आले, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ आश्रफ या दोघांची १५ एप्रिल रोजी प्रयाग राज येथे पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. विशाल तिवारी या वकिलांनी या हत्याकांडाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी मारेकऱ्यांना अतिकची माहिती कशी कळाली, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला विचारला आहे.
आम्ही या हत्येची दृश्ये टीव्हीवर पाहिली आहेत. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून त्यांना रुग्णवाहिकेतून थेट नेता आले असते. असे असताना त्यांची प्रसार माध्यमासमोर परेड का काढण्यात आली, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. उत्तर प्रदेश सरकारची बाजू प्रसिद्ध ॲडव्होकेट मुकूल रोहतगी मांडत आहेत. ते म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. प्रत्येक दोन दिवसांनी त्यांची तपासणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याने प्रसार माध्यमांना त्याची माहिती होती. अतिक अहमद आणि त्याचे कुटुंब गेली तीस वर्षे गुन्हेगारी प्रकरणात अडकले आहे. त्यांची झालेली हत्या घृणास्पद आहे. मारेकऱ्यांना तातडीने पकडले असून त्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे केल्याचे मान्य केले आहे. प्रत्येकाने ही हत्या कशी झाली ते टीव्हीवर पाहिले आहे. मारेकरी वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वेशभुषेत आले होते. त्यांच्याकडे पास, कॅमेरे आणि ओळखपत्रे होती. अर्थात, ओळखपत्र बनावट असल्याचे नंतर उघकीस आले. आसपास पन्नासच्या आसपास लोक असल्याने त्यांना ही हत्या करणे सोपे गेले.
वृत्तसंस्था