सग्रहीत छायाचित्र
उत्तराखंड | केदारनाथ धामजवळ आज पहाटे भीषण हेलिकॉप्टर अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास गौरीकुंडला जाणारे हे हेलिकॉप्टर कोसळले. मृतांमध्ये पाच भाविक, एक लहान मूल आणि पायलट यांचा समावेश असून, हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील होते. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल होऊन तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र हेलिकॉप्टरमधील कुणालाही वाचवता आले नाही.
हेलिकॉप्टर सेवा तातडीने स्थगित
या अपघाताचा थेट परिणाम चारधाम यात्रेवर झाला असून, उत्तराखंड प्रशासनाने तातडीने सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंदच राहणार आहे. हा निर्णय भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांची तात्काळ प्रतिक्रिया
घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर ऑपरेशन्सबाबत कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यात हेली सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर एसओपी (Standard Operating Procedure) तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची सखोल तांत्रिक तपासणी झाली पाहिजे. याशिवाय, हवामानाविषयी अचूक आणि अद्ययावत माहितीही बंधनकारक केली जाईल." मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून, ही समिती हेली ऑपरेशन्समधील तांत्रिक आणि सुरक्षा उपायांचा सविस्तर आढावा घेणार आहे.
वारंवार अपघातांमुळे चिंता वाढली
गेल्या सहा आठवड्यांतील ही पाचवी हवाई दुर्घटना असल्याने यात्रेतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धार्मिक पर्यटनाच्या हंगामात भाविकांची वाढती गर्दी आणि हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सजग आणि उत्तरदायित्वाने कार्य करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.