प्रातिनिधिक छायाचित्र...
हृदयविकाराचे प्रमाण अन्य कारणांनी वाढल्याचाही खुलासा.....
नवी दिल्ली | देशात कोविडच्या महामारीनंतरच्या काळात घडणाऱ्या काही अचानक मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीकरणाशी याचा काही संबंध आहे का, याबाबत अनेक अफवा आणि संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः १८ ते ४५ वर्ष या वयोगटातील अनेक तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याबाबत देशभरातून चिंता व्यक्त होत होती. याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) या देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासांतून समोर आलेल्या निष्कर्षांवरून महत्वाची माहिती दिली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि एम्सच्या संयुक्त अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे. कोविड-१९ नंतर प्रौढांच्या अचानक मृत्यूचा कोरोना लसीशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने,तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लस यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा अभ्यास मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ रुग्णालयांमध्ये करण्यात आला. हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आला जे पूर्णपणे निरोगी होते. परंतु ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान अचानक मृत्युमुखी पडले. कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला नाही, असे अभ्यासात दिसून आले. तरुणांच्या अचानक मृत्यूचा आणि या लसीचा कोणताही संबंध नाही.
ही आहेत अचानक मृत्यूमागील कारणे
हा अभ्यास अशा वेळी समोर आला आहे जेव्हा देशभरात तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र या अचानक मृत्यूंमागील कारण समजून घेण्याचे काम करत आहेत. या अभ्यासात, जीवनशैली आणि मागील परिस्थिती अचानक मृत्यूचे मुख्य कारण मानण्यात आली आहे. या निवेदनात त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, आनुवंशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि कोविडची लागण झाल्यानंतर निर्माण झालेली गुंतागुंत यांसह विविध घटकांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. विविध कारणांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामध्ये जेनेटिक्स, जीवनशैली, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या आणि कोविडनंतरचे कॉम्प्लिकेशन्स यांचा समावेश आहे.
लसीबद्दल अपप्रचार करणे धोकादायक
वैज्ञानिक तज्ज्ञांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यू होत असल्याचा दावा पूर्णतः खोटा व दिशाभूल करणारा आहे.अशा अपप्रचारामुळे जनतेमध्ये लसीबाबत भीती निर्माण होऊन लस न घेण्याचा धोका वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर होऊ शकतो.लसीकरणामुळे निर्माण होणारे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये अचानक मृत्यूमागे असलेली कारणे ही वैयक्तिक आरोग्यस्थिती, अनुवंशिकता, जीवनशैली व कोविड संसर्गानंतरची गुंतागुंत यांशी संबंधित आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणे चुकीचे असल्याचे वैज्ञानिक तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत.
दरम्यान नुकतेच अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४२ वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. त्याआधी अभिनेता श्रेयस तळपदे, सुष्मिता सेन यांसारख्या अत्यंत फिट आणि स्वत:च्या आरोग्याची, फिटनेसची नियमित काळजी घेणाऱ्या कलाकारांनाही हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले आहेत. अशा केसेसनंतर कोविड प्रतिबंधक लस आणि कमी वयातच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला.