गेल्या काही महिन्यांत सतत चढ-उतार अनुभवणाऱ्या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे गेली होती. मात्र सध्या हे दर ९७,००० रुपयांवर स्थिरावले आहेत. तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोन्याच्या किमतीत जवळपास १२,००० रुपयांची घसरण होऊ शकते.
तज्ज्ञाच्या मते, सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे दर ८० ते ८५ हजार रुपयांदरम्यान जाऊ शकतात. एप्रिल-मे महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात सुमारे १० टक्के वाढ झाली होती. मात्र सध्या काही जागतिक आणि आर्थिक कारणांमुळे हे दर पुन्हा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताच्या पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरही सोन्याच्या दरात एकदा घट झाली होती. तेव्हा प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत २,००० रुपयांची घट नोंदली गेली होती. ताज्या परिस्थितीतही अशीच घसरण होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
सोन्याच्या किमती घसरण्यामागील कारणे
1. जेव्हा सोन्याचे दर उच्च पातळीवर पोहोचतात, तेव्हा गुंतवणूकदार नफा कमावण्यासाठी विक्री करतात. अलीकडील काळात सोन्याच्या ईटीएफमध्ये वाढ झाल्याने विक्रीचा दबाव वाढू शकतो.
2. जागतिक राजकारण आणि तणावांचा सोन्याच्या दरांवर प्रभाव असतो. सध्या अमेरिका टॅरिफ संदर्भात सौम्य भूमिका घेत आहे आणि भारत-पाकिस्तान तणावातही काही प्रमाणात शिथिलता आली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्यातील आकर्षण कमी झाले आहे.
3. आरबीआयची ६ जून रोजी होणारी मॉनेटरी पॉलिसी बैठकही निर्णायक ठरू शकते. जर रेपो दरात कपात झाली, तर त्यामुळे आर्थिक साखळीवर परिणाम होऊन सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता आहे.
4. अमेरिकेतील व्याजदर धोरण देखील महत्त्वाचे ठरणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत फेडवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आणत असले तरी, सध्या दर कपातीची शक्यता कमी वाटते. दर कपात झाल्यास सोने महाग होण्याची शक्यता असते, मात्र त्याउलट परिस्थिती असेल, तर दरात घसरण संभवते.