'हवाला'च्या पैशांवर गोवा निवडणुकीचा प्रचार
#नवी दिल्ली
दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आम आदमी पक्षावर अनेक मोठे आरोप करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने हवालामार्गे पैसा घेतला, तसेच या पैशांचा वापर गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी केला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आम्ही केलेल्या चौकशीत हे समोर आले आहे की, शेरिएट प्रॉडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक राजेश जोशी आणि इतर अनेक लोक संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहभागी होते. या कंपनीमार्फत केवळ बँकेकडूनच नव्हे तर हवाला नेटवर्कच्या माध्यमातून रोख पैसेही मिळाले आहेत. तसेच या पैशांचा वापर पक्षाने गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी केला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास मागच्या वर्षीच सुरू झाला होता. ३० कोटी रुपये आम आदमी पक्षाला हवालामार्फत हस्तांतरित करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. हेच पैसे गोव्यात उमेदवाराकडे देण्यात आले. बँकेतील व्यवहार आणि रोख स्वरूपात हा व्यवहार झाला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.