मुख्यमंत्रीपद द्या लिंगायत नेत्यालाच
#बंगळुरू
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्रीपद द्यायचे यावरून निर्णय प्रक्रियेला वेग आला असतानाच आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. अखिल भारतीय वीरशैव महासभेने काँग्रेसला पात्र पाठवत मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपद हे लिंगायत नेत्यालाच दिले जावे, अशी स्पष्ट मागणी महासभेने या पत्राद्वारे काँग्रेसकडे केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांना लिहिलेल्या या पत्रात महासभेने थेट मुद्यातलाच हात घालत मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. काँग्रेसने ४६ लिंगायत उमेदवारांना तिकीट दिले होते त्यातील ३४ उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यातील ५० मतदारसंघात लिंगायत समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना विजय आहे. लिंगायत समाजाला भाजपकडून काँग्रेसकडे वळवण्यास आम्हाला यश आल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार लिंग्यात असायला हवा, असा आग्रह महासभेने धरला आहे.
अन्यथा वेगळा विचार करावा लागेल
येडियुरप्पा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात तीन लिंगायत आमदारांना मंत्रीपदी संधी दिली होती. त्यांच्यानंतर बोम्मई वगळता मंत्रिमंडळात एकाही लिंगायत नेत्याला संधी देण्यात आली नाही. याची शिक्षा लिंगायत समाजाने भाजपला दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा लिंगायत समाजाचाच असायला हवा, असा आग्रह अखिल भारतीय वीरशैव महासभेने धरला आहे. इतकेच नाही तर आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही काँग्रेसला महासभेने दिला आहे. दरम्यान इतर जातीसमूहाच्या संघटनांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे.