मोफत बससेवेचा असाही लाभ!
#दक्षिण कन्नड
सरकारने लागू केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा कोणाला कसा लाभ होईल हे सांगणे कठीण आहे. कर्नाटकात राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवास करण्याची योजना राबवली आहे, या योजनेचा लाभ घेत एका महिलेने चक्क नवऱ्यासोबत संसार अर्ध्यावर टाकण्यासाठी प्रियकराला गाठले आहे. दक्षिण कन्नड भागात हा प्रकार घडला आहे.
कर्नाटकात महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेचा फायदा घेत एका विवाहित तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीला ११ महिन्यांचे अपत्य आहे. हुबळी येथे राहणारी तरुणी पुत्तूर येथे मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या प्रेमात पडली होती. या प्रेमप्रकरणाविषयी संबंधित तरुणीच्या घरी कळल्यावर तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिले. लग्नानंतर तरुणी गरोदर राहिल्याने बाळंतपणासाठी ती माहेर आली. लग्नानंतरही ती आपल्या प्रियकराच्या संपर्कात होती. माहेरी आल्यानंतर तरुणीच्या प्रियकराने तिला त्याच्याकडे बोलावले होते. परंतु, पुत्तूर येथे जाण्याकरता तिच्याकडे पैसे नव्हते. तरुणीचे प्रेमप्रकरण कळल्यापासून तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले होते.
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यात महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे या मोफत बस सेवेचा लाभ उठवत १३ जून रोजी तिने सरकारी बसमधून प्रवास करून ती प्रियकारकडे गेली. तरुणी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी थेट पुत्तूर गाठले. कारण त्यांना माहित होते की ती तिथेच जाणार. तिथे गेल्यावर समजले की तिचा प्रियकरसुद्धा कदंबडी गावातून पसार झाला आहे. याप्रकरणी पुत्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, पळून गेलेली तरुणी आणि तिचा प्रियकर सिद्दकत्ते गावात आहेत.