Northeast India : पूरामुळे ईशान्य भारतात हाहाकार; आसामसह सात राज्यांत ४८ जणांचा मृत्यू

ईशान्य भारतात मुसळधार पावसाने प्रचंड पूरस्थिती निर्माण केली असून आसामसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आसाममधील पूर परिस्थिती अधिकच बिकट बनली असून, आतापर्यंत या राज्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Wed, 4 Jun 2025
  • 12:53 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

गुवाहाटी – ईशान्य भारतात मुसळधार पावसाने प्रचंड पूरस्थिती निर्माण केली असून आसामसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आसाममधील पूर परिस्थिती अधिकच बिकट बनली असून, आतापर्यंत या राज्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण सात राज्यांमध्ये पूर व भूस्खलनामुळे मृतांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत आसाम व सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी चर्चा केली. पूर परिस्थितीचा आढावा घेत केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

 

राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये १७, अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरात २ आणि नागालँड व मणिपूरमध्ये प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे केवळ मिझोराममध्ये गेल्या १०० दिवसांत तब्बल ६०० पेक्षा अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

आसाममध्ये ६ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार, राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ६.३३ लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. सुमारे १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. ब्रह्मपुत्रा नदीसह सहा नद्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.

मणिपूर आणि नागालँडमध्ये वाहतूक ठप्प

मणिपूरमध्ये पुरामुळे ५६,००० हून अधिक नागरिक प्रभावित झाले असून, १०,४७७ घरांचे नुकसान झाले आहे. राजधानी इम्फाळसह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर पसरला आहे. नागालँडमध्ये कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग पावसामुळे वाहून गेला आहे. परिणामी मणिपूर व नागालँडमधील प्रमुख वाहतूक मार्ग तुटले असून, सुमारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रस्त्यावर अडकले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

Share this story

Latest