सग्रहीत छायाचित्र
अहमदाबाद | अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पार्थिवाची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटली असून, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गृहमंत्री संघवी म्हणाले की, “डीएनए चाचणी अहवालानंतर विजयभाई रुपाणी यांचे पार्थिव ओळखले गेले असून, आज संध्याकाळी ते त्यांच्या कुटुंबीयांना सोपवले जाईल.”
एकमेव बचावलेला प्रवासी
ही दुर्घटना केवळ गुजरातच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली. एअर इंडिया कंपनीच्या या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एकच प्रवासी बचावला, जो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली.
शासकीय मदत आणि ओळख पटवण्याचे काम सुरू
विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर शवविच्छेदन व मृतदेह ओळख प्रक्रियेवर विशेष भर देण्यात येत आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी माहिती दिली की, "दुर्घटनेनंतर लगेचच २५० हून अधिक डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डीएनए नमुने जुळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे."
राज्य सरकारकडून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, मृतांचे पार्थिव त्यांच्या नातेवाइकांना शक्य तितक्या लवकर सुपूर्त करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.