अनैतिक संबंधांना पाठबळ देणारे निर्णय नकोत
#नवी दिल्ली
समलिंगी विवाह कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी सुरू आहे. गुरुवारी सुनावणीचा सहावा दिवस होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना जोडीदार निवडीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. याचिकाकर्त्यांनी समलिंगी विवाह कायद्याची मागणी केली आहे. मात्र, या विवाहाला मान्यता दिल्यास अनैतिक संबंधांनाही संरक्षण मिळेल, अशी शक्यता मेहता यांनी व्यक्त केली आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस. रवींद्र भट, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर गुरुवारी सहाव्या दिवशी ही सुनावणी झाली. आपल्या युक्तिवादात मेहता म्हणाले, 'समजा, एखादी व्यक्ती प्रतिबंधित असलेल्या नात्यातच आकर्षित झाली तर? समजा, एखादी व्यक्ती आपल्या बहिणीलाच आकर्षित झाली तर ते म्हणू शकतात की आम्ही प्रौढ आहोत. आम्ही आमच्या खासगी आयुष्यात काहीही करू शकतो. आम्हाला जोडीदार निवडीचा अधिकार आहे. याच युक्तिवादाच्या आधारे उद्या कोणीही पालकांनी ठरवलेल्या विवाहाला आव्हान देऊ शकेल. या विवाहासाठी निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात, असा सवाल उपस्थित केला जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.वृत्तसंस्था