डीके-सिद्दरामय्या यांचे मनोमिलन
#नवी दिल्ली
कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होण्यास तीन दिवस बाकी असताना काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दर्शविणारा व्हीडीओ व्हायरल केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जारी केलेल्या व्हीडीओमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि डी. के. शिवकुमार दिसत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या बाजूने वातावरण अनुकूल असून नव्या मुख्यमंत्रिपदासाठी डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्यात जोरदार रस्सीखेच असल्याचे मानले जाते. या व्हीडीओत दोन्ही नेते कर्नाटकमधील पक्षाची प्रचार मोहीम, हेलिकॉप्टर अपघात, लोकांचा पक्षाला असलेला पाठिंबा आदी विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारताना पाहावयास मिळते. यातील संभाषणाचा काही भाग संदर्भहीन भासत असला तरी तो जनतेच्या मनातील नाहक शंका दूर करण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते.
या व्हीडीओ समवेत केलेल्या ट्विटमध्ये शिवकुमार म्हणतात की, राज्यात प्रचाराची मोठी दंगल उसळलेली असून त्यातून वेळ काढून मी सिद्दरामय्या यांच्यासमवेत गप्पा मारल्या. परस्परांची मते जाणून घेतली. हा व्हीडीओ पाहिल्यावर याचा दुसरा भाग कधी येणार याची तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल. याचा दुसरा भाग लवकरच आम्ही सादर करू. या पाच मिनिटांच्या व्हीडीओ क्लीपमध्ये संभाषण कन्नडमध्ये झालेले असले तरी त्याला खाली इंग्रजी सब टायटल दिलेली आहेत. सुरुवातीला शिवकुमार हे सिद्दरामय्या यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत. सिद्दरामय्या हे डाव्या हाताला व्हायरल इन्फेक्शन झाल्याने काही काळ आजारी होते. त्यानंतर सिद्दरामय्या हे शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत चौकशी करताना पाहावयास मिळते. त्याला उत्तर देताना शिवकुमार म्हणतात की, साधारण चार-ते पाच किलो वजनाच्या एका पक्ष्याने आमच्या हेलिकॉप्टरच्या ग्लासला धडक दिली. त्यातून आम्ही सुदैवाने वाचलो.
त्यानंतर उभय नेत्यांतील संभाषण राज्यात काँग्रेस पक्षाला कसा प्रतिसाद मिळत आहे, कोठे आणखी लक्ष देण्याची गरज आहे या विषयाकडे वळते. त्यांच्या संभाषणानुसार पक्षाला राज्यात ठिकठिकाणी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असून मतदानावेळी योग्य लक्ष दिले तर प्रचंड बहुमताने पक्ष सत्तेवर येणार असल्याचा विश्वास ते व्यक्त करताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असून त्यांच्यातील स्पर्धा लपून राहिलेली नाही. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणती पाच आश्वासने पूर्ण करायची आणि बाकीची आश्वासने कधी पूर्ण करायची यावरही ते चर्चा करताना पाहायला मिळते.
वृत्तसंस्था