मलिक यांना अटक केली नसल्याचा खुलासा
#नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना अटक केलेली नसून ते स्वत:हून आर. के. पूरम पोलीस स्थानकात आपल्या समर्थकांसमवेत आले होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. सीबीआय या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने त्यांना विमा घोटाळ्याच्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांना अटक केलेली नाही किंवा त्यांना ताब्यात घेतलेले नाही, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अटकेबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ते आपल्या इच्छेने केव्हाही जाऊ शकतात असे पोलिसांनी स्पष्ट केले.
शनिवारी मलिक यांच्या समर्थनार्थ आर. के. पूरम भागात खाप पंचायत आयोजित केली होती. ही खाप पंचायत हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमधील ३६ प्रमुख खाप संघटनांनी आयोजित केली होती. मात्र, यासाठी परवानगी घेतली नसल्याने ती रद्द करण्यात आली. भारतीय किसान युनियनच्या काही नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर मलिक हे आपल्या समर्थकांसह आर. के. पूरम पोलीस ठाण्यात आले. भारतीय किसान युनियनचे गुरनाम सिंग यांनी मलिक यांना अटक केली असल्याबद्दल एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. ते यामध्ये म्हणतात की, मलिक यांना अटक केली जाईल अशी मला काल शंका वाटत होती. मलिक यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबाबत अशी शंका येणे साहजिक होते. त्यानंतर मला समजले की सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे. मलिक यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेला कार्यक्रम पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रद्द केला आहे. मलिक यांना अटक केल्याचे कळते. काही नेत्यांसमवेत मलाही अटक केली आहे. मला अटकेच्या निषेधार्थ चक्का जाम सुरू करायचे का अशी विचारणा करणारे फोन आले असून त्यांना मी तूर्त शांतता पाळण्यास सांगितले आहे. मलिक यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये २०१९ च्या पुलवामा हल्ल्याबाबत काही खळबळजनक माहिती दिली होती. या मुलाखतीनंतर ताबडतोब मलिक यांना सीबीआयने समन्स बजावले होते. वृत्तसंस्था