काँग्रेसची ‘मेरा घर, आपका घर’ मोहीम
#नवी दिल्ली
बदनामी खटल्यात संसद सदस्यत्व रद्द झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १२, तुघलक लेन हे आपले अधिकृत निवासस्थान खाली केले. दरम्यान, काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी राहुल यांना पाठिंबा दर्शवताना सोशल मीडियावर ‘मेरा घर, आपका घर’ ही हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे.
राहुल यांनी आपल्या बंगल्यातील सर्व साहित्य शुक्रवारीच हलवले असून शनिवारी त्यांनी आपल्या बंगल्याचा ताबा लोकसभा सचिवांकडे सुपूर्द केला. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीमुळे सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. कायदेशीर तरतुदीमुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले आणि पाठोपाठ अधिकृत निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली गेली. राहुल गांधी या बंगल्यात दोन दशकांहून अधिक काळ वास्तव्य करत होते. १४ एप्रिलला राहुल यांनी आपले काही साहित्य आणि कार्यालयीन कागदपत्रे आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी हलवली होती. तेव्हापासून राहुल हे सोनिया यांच्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत.
दरम्यान, काँग्रेसने ‘मेरा घर, आपका घर’ ही हॅशटॅग मोहीम सुरू केली असून ट्विटरवर काँग्रेस म्हणते की, सारा देश राहुल गांधी यांचे निवासस्थान आहे. राहुल हे नागरिकांच्या हृदयात राहतात. सामान्य जनतेशी असलेले राहुल गांधी यांचे नाते तोडता येणार नाही. काहीजण त्यांच्यात आपला मुलगा पाहतात, काहीजण आपला भाऊ पाहतात, काहीजण त्यांना आपला नेता मानतात. राहुल प्रत्येकाचे आहेत आणि प्रत्येकजण राहुल यांचा आहे. यामुळे देशातील सारे आज म्हणत आहेत की, राहुलजी माय हाऊस, युवर हाऊस, # मेरा घर, आपका घर #
राहुल यांच्या कृत्याचे कौतुक करून काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणतात की, लोकसभा सचिवालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांनी आपले १२, तुघलक रोड हे अधिकृत निवासस्थान खाली केले आहे. न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यांचे संसद सदस्यत्व त्यांना पुन्हा बहाल होऊ शकते. असे असतानाही त्यांनी बंगला खाली करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, एखादे घर हे चार भिंती आणि सिमेंटने बनवले जाते. घर ही एक शांततेची, प्रेमाची भावना आहे. त्यातच देशातील कोट्यवधी लोक आपल्या हृदयाचे आणि घराचे दरवाजे तुमच्यासाठी खुले करतात तेव्हा तुम्हाला साध्या घराची गरज नसते. राहुल गांधी हे सत्याग्रही असून त्यांना कोणी भीती घालू शकत नाही. त्यांना कोणी घाबरवू शकत नाही. सत्यासाठी कोणतीही किंमत चुकवायची त्यांची तयारी आहे. # मेरा घर, आपका घर # हे देशवासियांचे राहुल यांच्यावरील प्रेम प्रकट करणारे एक छोटेसे उदाहरण आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणतात की, भाजपवाले राहुल यांना घरातून बाहेर काढू शकतात. मात्र, देशवासियांच्या घरात, हृदयात असलेले त्यांचे स्थान त्यांना कधी हलवता येणार नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळे जनतेसाठी आवाज उठवण्यापासून राहुल यांना कोणी परावृत्त करू शकणार नाही. त्यामुळेच तर सारा देश आज म्हणत आहे की, # मेरा घर, आपका घर #
वृत्तसंस्था